कुकडेश्वर मंदिर : जुन्नर

नाणेघाटातून आमची गाडी आता कुकडेश्वरच्या दिशेने दौडू लागली होती. आधी जेवण का आधी कुकडेश्वर? या वर चर्चा सुरु झाली पण फारशी नाट्यमयता न येता अगदी सर्वांनीच ‘आधी विठोबा’ अर्थात आधी कुकडेश्वर मंदिर असे एकमुखाने सांगितले.

कुकडेश्वर मंदिर:

कुकडी नदीचा उगम जिथे होतो तिथे कुकडेश्वराचे मंदिर आहे. जुन्नर पासून किल्ले चावंड अर्थात प्रसन्नगडच्या दिशेने जाताना साधारण २० किलोमीटर वर हे मंदिर स्थित आहे. साधारण सातशे  वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. शिलाहार वंशीय झंझ राजाने अनेक शिवालये उभारली त्यापैकी हे एक शिवालय आहे. पूर गावातील हे स्थान ‘पूरचा कुकडेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे.. चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले.

IMG_5045

मंदिराजवळ पोचताच द्वारशाखेवरील  सुरेख गणेश पट्टीने आमचे लक्ष वेधून घेतले. गणेशाच्या दोन्ही बाजूला विविध वाद्ये हातात घेतलेले शिवगण कोरलेले आहेत. मंदिराच्या दारावर दोन्ही बाजूला शैव द्वारपाल असून त्यांच्याच शेजारी खांद्यावर घागर घेतलेली  नदी(गंगा आणि यमुना) देवतेची  मूर्ती आहे. प्रत्येक शिव मंदिराप्रमाणे इथे पण  कीर्तिमुख आहे.

20190929_144338

आत शिरताच सभामंडप(नंदी मंडप), अंतराळ व गर्भगृह अशा भागात विभागलेले मंदिर पाहायला मिळाले. सभामंडपात, एका देवकोष्टात अतिशय सुंदरअसे शिवपार्वतीचे शिल्प आहे. आत दिसणारे विविध खांब, त्यावरील कोरीवकाम हे सुद्धा लक्षवेधक होते.

प्रत्येक खांबावर मंदिराचा भार पेलणारे गंधर्व, यक्ष, किन्नर दिसून आले. आतील काही खांबांवर सुरसुंदरी, गणेश, शिव पार्वती, नर्तिका, वादक यांची सुरेख शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचा बाहेरचा भाग विविध थरात विभागला गेला असून त्यात हंस पट्टी, तसेच कीर्तिमुख, कलश, फुले, वेगवेगळ्या भूमितीय आकृत्या अशा विविध शिल्पांनी नटलेला होता.

20190929_142354

काही वर्षांपूर्वी या मंदिराचे शिखर ढासळले त्यामुळे  पुरातत्व खात्याने मंदिराच्या उरलेल्या भागाची पुनर्बांधणी केली.

IMG_5046

कुकडेश्वराच्या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्या सांस्कृतिक वैभवाची, समृद्ध इतिहासाची  साक्ष देत आजही उभी आहेत.  त्याचे योग्यरीत्या जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

उगमाच्या जवळ धेनु गळ (वीरगळ)आहे.

20190929_144721
धेनु अर्थात गायीला वाचवताना या वीराचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा वीरगळ असल्याचे शिल्पातून दिसते.

20190929_142705

मंदिर पाहता पाहता ३,३:३०  वाजायला आले, जेवण अजून करायचे होते. पण जेवण झाले नसले तरी आमची पोटे भरली होती. अनेक नवीन गोष्टी, ठिकाणं पाहिली होती, अनुभवली होती.  त्यामुळे पटकन जेवण उरकून आता पुढे अजून काय काय पाहता येईल याच्यावर चर्चा सुरु झाली. आणि आम्हाला बघायला मिळाला: आडवाटेत लपलेला पण तरीही गतकाळातील वैभवाच्या खुणा जागोजागी दर्शविणारा असा निजामशाहच्या वजिराचा एक अप्रतिम महाल ‘मलिक अंबर पॅलेस’ जाणून घेऊया पुढील भागात

 

Leave a comment