त्रिशुंड गणपती मंदिर

त्रिशुंड गणपती मंदिर
सोमवार पेठेतील अगदी गजबजलेला, वाहता रस्ता पण तिथून एका गल्लीत वळण घेताच काही बिल्डींग्सच्या मधोमध दडलेलं हे शिल्प लेणं आहे २५० वर्षांपेक्षाही पूर्वीचे.

कमला नेहरू हॉस्पिटल जवळचे हे त्रिशुंड गणपतीचे पेशवेकालीन मंदिर, राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य कलेचा प्रभाव असलेले आढळते. साधारण पाच फुटी जोत्यावर हे मंदिर स्थित आहे.

त्रिशुंड मंदिराचे प्रवेशद्वार
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध शिल्प पट कोरलेले आहेत. यातील एकेक शिल्प बघताना आपण अगदी थक्क होतो. घंटेची साखळी हातात धरलेले भारवाही यक्ष तर कुठे विविध पक्षी मोर, पोपट तसेच यक्ष किन्नर हे कोरलेले दिसतात. इथे गजव्याल अशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते. दाराच्या दोन्हीबाजूला द्वारपाल आहेत.

मंदिराचे प्रवेश द्वार व त्याच्या बाजूची भिंत अनेक शिल्पाने सुशोभित आहे.. दशावतार, यक्ष, कृष्ण तसेच इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत.इथे द्वारावर मकर तोरण बघायला मिळते.

ललाटबिंबावरील गणेश त्याच्यावर गजलक्ष्मी आणि वर पिसारा फुलवलेले मोर व शेषशायी विष्णू अशी शिल्पांची लयलूट दिसून येते अंत्यंत रेखीव द्वारपाल यांच्या बरोबरीनेच एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपले लक्ष वेधून घेते. इंग्रज अधिकारी बंगाल आणि आसामच्या शक्तीच्या प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने जखडत आहे. प्लासी च्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने आसाम व बंगाल या प्रांतांवर मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे हे शिल्प असावे असे जाणकारांचे मत आहे.

इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातातील बंदुका पण या शिल्पात दिसून येतात या शिल्पाच्या खाली एकमेकांशी झुंजणारे हत्ती पण दिसून येतात.

सभामंडप, अंतराळ व गाभारा

सभामंडपाचे छत घुमटाकार असून सभामंडप बऱ्यापैकी मोठा आहे. अंतराळ छोटा असून तिथे छतावर मध्यभागी फुलांची नक्षी कोरलेली आहे.

गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस देवकोष्ठे असून प्रत्येकावर चित्र वेगवेगळी आहेत. एका देवकोष्ठावर पोपट तर एकावर हत्ती अशी शिल्प आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारात साधू वेशातले द्वारपाल दिसून येतात.
गाभाऱ्याच्या शिवाचे शिल्प असून ते पार्वती व शक्ती सहित कोरलेले आहेत.पार्वतीचे वाहन सिँह आणि शिवाचे वाहन नंदी कोरलेले दिसून येतात. या शिल्पाच्या वरती शिलालेख आहेत ते फारसी, संस्कृतमध्ये आहेत. इंदूरच्या धामापूर येथील भीमगीरीजी गोसावी यांनी हे मंदिर बांधल्याची माहिती मिळते. या मंदिराचे बांधकाम १७५४ मध्ये सुरु झाल्याचा उल्लेख मिळतो.


यातल्या संस्कृत शिलालेखात हे मंदिर महांकाल रामेश्वर शिवाचे असल्याचा उल्लेख सापडतो तर फारसी शिलालेखात हे मकान श्रीगुरुदेव दत्त यांचे असल्याचा उल्लेख सापडतो.

त्रिशुंड गणेश मूर्ती :
ज्या मूर्तीमुळे ह्या गणपती मंदिराचे नाव त्रिशुंड गणपती मंदिर असे आहे ती तीन सोंडा असलेली मूर्ती अत्यंत सुबक व रेखीव आहे.एक मुखी,सहा हात व तीन सोंडा असलेली ही मूर्ती मूळची काळ्या पाषाणातली असून शेंदूर चर्चित आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशा पद्धत हे मंदिर आहे. एक मुखी, सहा हात व तीन सोंडा असलेली ही मूर्ती मूळची काळ्या पाषाणातली असून आता शेंदूर चर्चित आहे.


मयूरावर चौरंग आणि त्यावर अत्यंत कोरीव अशी ही गणेश मूर्ती गणेशमूर्ती प्रथापित आहे. गणपती शेंदूर चर्चित गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर असलेल्या शक्तीच्या हनुवटीला एका सोंडेने स्पर्श करत आहे तर एका सोंडेने मोदकाला स्पर्श तर मधली सोंड मयुराच्या डोक्यावर ठेवली आहे. मोराच्या तोंडात नाग आहे अशी ही अतिशय वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती आहे.


मूर्तीच्या मागे शेषशायी नारायणाचे अतिशय सुंदर शिल्प कोरले आहे व त्यावर गणेश यंत्र प्रस्थापित केले आहे.

तळघरातील समाधी
तळघरात दलापत गोसावी यांची समाधी आहे. गणेश मूर्ती च्या बरोबर खाली ही समाधी आहे आणि अभिषेकाचे पाणी बरोबर त्या समाधी वर पडते. सभामंडपातून तसेच गाभाऱ्यातून खाली तळघरात जाता येते. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना तळघरात जाऊन समाधीचे दर्शन घ्यायची परवानगी आहे. इतरवेळी या तळघरात पाणी असते व ते व्यवस्थापनाद्वारे गुरुपौर्णिमेला उपसून काढून भाविकांसाठी दर्शनासाठी सोय केली जाते.


लिंगोद्भव शिव :
त्रिशुंड गणपतीच्या प्रदक्षिणा मार्गात मागच्या भिंतीला एक अनोखे शिल्प कोरलेले आहे. हे लिंगोद्भव शिव आहे. फक्त शाळुंका रूपातील या मूर्तीस नागाने छत्र धरलेले असून वर जाणारा हंस व खालच्या दिशेने मुसंडी मारणारा वराह कोरलेला आहे. या मूर्तीसंदर्भात एक कथा सांगण्यात येते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद सुरु झाला तेव्हा शिव अग्नी स्तंभाच्या रूपाने प्रकट झाले व त्यांना या स्तंभाचा आदी व अंत शोधण्यास सांगितले . विष्णूने वराहरूपात त्या स्तंभाचा आदी शोधायचा प्रयत्न केला व पाताळात मुसंडी मारली तर ब्रह्माने हंस रूपात त्या स्तंभाचा अंत शोधण्यासाठी आकाशात झेप घेतली. पण दोघेही या कामात अयशस्वी ठरले व शेवटी शंकराला शरण गेले.

हे मंदिर पेशवे कालीन असूनही कुठेही लाकडी कलाकुसर आढळत नाही तर काळ्या पाषाणावर केलेले नाजूक नक्षीकाम दिसून येते.

पुणेकरांनी तसेच बाहेरगावाहून पुण्यातील वारसास्थळे बघण्यासाठी आलेल्या लोकांनी आवर्जून पाहावे असे हे मंदिर आहे.

ठाण्याचे श्री. यशवंत अनंत मोरे यांनी खूप परिश्रम घेऊन ह्या मंदिराची जागा स्वच्छ केली व पूजा अर्चा सुरु केली, भीमगीरीजीनचे वंशज कैलासगिरजी १९५२ मध्ये पुण्यात आले आणि त्या नंतर इथे उत्सव सुरु झाले व हळूहळू हे मंदिर भाविकांच्या नजरेत भरू लागले. हे दोन्ही उल्लेख डी.डी.रेगे यांच्या पुणे व प्राचीन धार्मिक स्थाने या पुस्तकात येतात. ह्या मंदिराला सकाळच्या व संध्याकाळच्या वेळात भेट देता येते.