बेडसे लेणी: एक अनमोल ठेवा 

1578668452368.JPEG

आजिवली देवराईची सफर संपवून आमची बस बेडसे लेण्यांकडे निघाली. काहीजण डुलक्या घेत होते तर काही जण चालत्या बसमधूनही दोन्ही बाजूने उभ्या ठाकलेल्या तुंग आणि तिकोना यांचे रूप कॅमेऱ्यात बंदिस्त करत होते. पवना नगरचा विस्तीर्ण जलाशय आणि त्याच्या बॅकड्रॉपला तुंग असा सुरेख फोटो आम्हाला टिपता आला. वाटेत एका चिंचोळ्या रस्त्यावर आमची बस अडली. बरोबर समोर एक टेम्पो येऊन उभा ठाकला होता. समोर आमची अवाढव्य बस बघूनही तो गाडी मागे न घेता शांतपणे थांबला होता. अरुंद रस्त्यामुळे दुतर्फा वाहतूक शक्यच नव्हती. आमच्या ड्रायव्हर चाचांनी जवळ जवळ पाचशे (५००) मीटर बस मागे नेली तेव्हा कुठे तो टेम्पो जागचा हलला आणि बाजूने गेला. बस सारखं अवजड वाहन चालवणं तसं जिकिरीचं काम. अरुंद, खाचखळग्यांनी भरलेले रस्ते, जुनी बस तसेच इतक्या लोकांची जबाबदारी चाचांवर. पण खरंच प्रत्येक ट्रिप यशस्वी होण्यामागे जेवढा हात टीम लीडर आणि इतर सदस्यांचा असतो तितकाच सुरक्षितरित्या आणि जबाबदारीने बस चालवणाऱ्या ड्रायव्हर काकांचा असतो.

 

938e4468-c785-4fc2-8ced-f02f3ee38d9e.jpg

Driver chacha photo Captured by Dr.Fene

 

साधारण पाऊण तासाने आमची बस बेडसे लेण्यांच्या पायथ्याशी पोचली. बेडसे गावामुळे या लेण्यांना ‘बेडसे लेणी’ असे नाव पडले आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाताना कामशेत गावाच्या थोडं अलीकडे बेडसे गाव आहे आणि गावाच्या पाठीमागे असणाऱ्या डोंगरावर ही लेणी आहेत. पवना नदीच्या खोऱ्यात भातराशी डोंगराच्या अगदी शेजारी,’सुमती’ नावाच्या डोंगरावर हे सौंदर्यशिल्प आहे. कार्ले भाजे लेण्यांपेक्षा काहीशी दुर्लक्षित त्यामुळे इथे वर्दळही कमी असते. पायथ्याशी गाडी लावायला सहज जागा मिळून जाते. लेण्यांच्या पायथ्याशी कृष्णाई नावाचे हॉटेल आहे, तिथे चहा नाश्त्याची सोय होऊ शकते.

08AC7A5A-C6C9-4EB7-9EE1-7429BB51D67A.jpg

 

खालून डोंगराकडे दृष्टिक्षेप टाकला कि लेण्यांच्या खाचा /गुहा दिसून येतात. वर चढायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं की साधारण दोनशे, अडीचशे पायऱ्या असतील पण प्रत्यक्षात ४००(चारशे)पायऱ्या होत्या.

IMG_5161

पण पायऱ्या चढायला अतिशय सोप्या आहेत. आमच्या गटातली सर्व जेष्ठ व कनिष्ठ मंडळी वर पटापट चढून आली.बाकी मंडळी वर चढायच्या आत आमच्या फिरस्तीच्या ग्रुप मधील ‘फास्टरफेणे’ अर्थात डॉक्टर दीपक फेणे यांचा मंदार पेशवेनी एक अप्रतिम फोटोही टिपला.

761cc86c-f656-4a97-8811-00d8b3f5e407.jpg

बेडसे लेणी चढण्यासाठी पुरातत्वखात्याने इथे नवीन पायऱ्या बांधल्या आहेत तसेच पावसाचे पाणी वाहून जावे, साठून राहू नये या साठी काही उंबरे पण केले आहेत. तरी मधून मधून काही जुन्या पायऱ्याही दिसून येतात.

चढताना दोन्ही बाजूला विस्तृत कठडे असल्यामुळे वाटेत दमल्यावर तिथे बसायचा विचार मनात आला तर झटकून टाकावा कारण बरेचदा त्या कठड्यांच्या जवळ साप ऊन खात बसलेले असतात. आम्ही पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती त्यामुळे सापांचे दर्शन काही झाले नाही पण वरती लेण्यांजवळ कात मात्र सापडली.

1578668452430.JPEG

 

बौद्ध भिक्षु धर्मप्रसारासाठी जेव्हा निरनिराळ्या ठिकाणी जायचे तेव्हा पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करायला लागायचा. ह्या लोकांची कायमस्वरूपी काही व्यवस्था करण्यात यावी यासाठी लेण्यांच्या निर्मिती करण्यात आली. भारतात बाराशे (१२००) लेणी आहेत त्यापैकी सुमारे आठशे लेणी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सर्व लेण्या व्यापारी मार्गावर आहेत. चांगला पोत असलेला कठीण आणि एकसंध असा पाषाण सह्याद्रीच्या अग्निजन्य खडकांच्या रूपात मिळाला.

1574155602902

 

आम्ही लेण्यांजवळ पोहोचताच सर्वप्रथम भव्य खांब दिसून आले. तिथे आमची वाट बघत A.S.I. (आर्कियॉलॉजिकल  सर्वे ऑफ इंडिया) चे संतोष दहिभाते आम्हाला माहिती देण्यासाठी थांबले होते.

ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात(इ.स.पूर्व पहिल्या शतकाचा उत्तरार्ध),एका एकसंध पाषाणात, जणू काही आधी कळस मग पाया असे वरून खाली फक्त छिन्नी हातोडीने इतके भव्य लेणे खोदण्यात आले. गुहेच्या बाहेर एक छोटा स्तूप होता त्याची माहिती देताना दहिभाते म्हणाले की पूर्वी आधी छोट्या प्रमाणावर शिल्पाची / छोट्या स्तूपाची निर्मिती करून ते काही वर्षांकरिता तसेच सोडण्यात यायचे. त्यावर ऊन,वारा,पाऊस याचा कसा परिणाम होतोय याचा अंदाज घेऊन पुढचे काम केले जायचे. भिक्षु एक दोन वर्षांनी परत त्याच स्थानी आले कि त्याचे निरीक्षण करून पुढचे काम करणे योग्य असेल का नाही ते ठरवत.

1578671114746.JPEG

आमची आपापसात चर्चा चालू होती “अतिशय रेखीव मूर्ती त्याकाळी फक्त छिन्नी हातोड्याने कशा बनवल्या जात असतील? खरंच अद्भुत आहे”.“त्यातून हा बसाल्ट खडक (अग्निजन्य खडक) अतिशय टणक आणि कठीण”.  A.S.I. चे दहिभाते आम्हाला माहिती देताना म्हणाले की त्याकाळात आधी छिन्नी आणि हातोड्याने एक मोठे भोक पाडून त्यात लाकूड ठेवले जायचे व सतत पाण्याचा मारा केला जायचा, त्यामुळे लाकूड फुगायचे व खडकाला तडा जायचा आणि तो खडक तोडणे सोपे व्हायचे.

1574155518433

 

घाटमाथ्यावर कोरलेली ही लेणी. त्यात भिक्षूंचे ध्यानमंदिर म्हणजे ‘चैत्यगृह’ आणि ‘वर्षा विहार’ म्हणजे राहण्याची सोय असे दोन विभाग पडतात. मोठा स्तूप, कलते खांब, चैत्याकार गवाक्षे तसेच वेदिका व लाकडी हर्मिका ही सर्व रचना इथे दिसून येते. आत शिरताच जे चार  खांब दिसतात त्या पैकी दोन खांब पूर्ण स्वरूपाचे तर दोन अर्ध स्तंभ आहेत.एकेक खांबांच निरीक्षण केल की खाली चौथरा, त्यावर कलश, त्यावर अष्टकोनी खांब आणि त्यावर उमललेलं सुरेख कमळ, त्यावर अश्वारूढ, गजारूढ स्त्री आणि पुरुष दिसून येतात. नीलगाय आणि बैलावर आरूढ स्त्री-पुरुष असे शिल्पही दिसले. हे स्त्री-पुरुष हातातील कंकण, माळा, कर्णफुले, अशा विविध आभूषणांनी नटलेले आहेत.

मुख्य चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर पिंपळपान तसेच त्याखाली चैत्यकमानी कोरलेल्या दिसतात. मुख्य चैत्यगृह सव्वीस खांबांवर उभे केले आहे. आतमध्ये मोठा स्तूप आहे. चैत्यगृहाजवळील खोलीच्या द्वारपट्टीवर एक शिलालेख मिळतो. नाशिकच्या आनंद नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाने ही खोली बांधली असल्याचा उल्लेख त्यावर आहे. एका शिलालेखात या भागाचे नाव ‘मारकुड’ असल्याचा उल्लेख देखील सापडतो. ज्या धनिकांनी, व्यापाऱ्यांनी अथवा राजांनी ही लेणी खोदण्यासाठी अनुदान दिले त्यांची नावे इथे ब्राह्मी लिपीमधील शिलालेखात आढळून येतात. पण ज्यांनी इतकी अद्भुत शिल्प खोदली मग ती कार्ले भाजे लेणी असूदेत किंवा अगदी वेरूळची लेणी; या शिल्पकारांची नावे मात्र कुठेही दिसून येत नाही. इतक्या सुबक आणि रेखीव मुर्त्या, शिल्पकाम पाहून मनोमन खात्री पटते :हे अनाम शिल्पकार, वास्तुरचनाकार खरे प्रतिभावंत.

1578668452041.JPEG

चैत्यगृहाच्या शेजारीच गजपृष्ठाकार एकसंध असे विहार आहेत. ते पण आवर्जून बघण्यासारखे.

या अतुलनीय शिल्पकृतींचे माहात्म्य गावे तितके थोडेच आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य अजून खुलून दिसते ते सकाळच्या वेळी. सुवर्ण किरणांनी न्हाऊन निघालेले चैत्यगृह आणि खांब पाहणं म्हणजे अद्भुत अनुभव आहे. संतोष दहिभातेनी आम्हाला पहाटेच्या सुवर्ण झळाळीचे काही फोटो दाखवले आणि असा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही परत येऊ तेव्हा पहाटे लवकर येऊ असा निश्चय ग्रुप मधल्या अनेकांनी केला.

लेणी नीट बघताना त्यांच्या सौंदर्याबरोबर काही क्लेशकारक गोष्टी सुद्धा जाणवतात. मुख्य चैत्यगृहाची शोभा वाढवणाऱ्या लाकडी फासळ्या आता गायब आहेत. हत्तीचे सुबक शिल्प आहे पण त्याच्या सुळ्यांच्या जागी  नुसत्याच खोबणी आहेत. पूर्वी तिथे हस्तिदंत किंवा लाकडी सुळे असावेत असा कयास आहे.
ही हीनयान पंथीयांची गुहा असून ते मूर्तिपूजक नाहीत त्यामुळे बुद्धाची मूर्ती आढळून येत नाही. पूर्वी इथे खांबांवर बुद्धाची आणि त्यांच्या शिष्यांची काही रंगीत चित्रे होती. हि चित्रे १८६१ (अठराशे एकसष्ट) पर्यंत अस्तित्वात असल्याची नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये सापडते. त्यानंतर कोणी बडा इंग्रजी अधिकारी येणार म्हणून स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने ही सर्व चित्रे खरवडून काढली आणि त्यावर सफेदीचा हात दिला आणि अजून एका अनमोल ठेव्याला आपण मुकलो.

1578671114677.JPEG

 

आम्ही लेण्यांवरून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा बाहेर अंधार दाटला होता तर मनात असंख्य विचार. हे सर्व वैभव बघताना कुठेतरी वेदना सुद्धा होतात की खरोखरच अशा वैभवाला आपण पात्र आहोत का? आपण खरंच हा अलौकिक ठेवा जपण्याचे योग्य ते प्रयत्न करत आहोत का?
भारतीय संस्कृतीचं महत्व स्वदेशी तसेच परदेशी नागरिकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचवण्यासाठी नुसतेच पुरातत्व खाते नाही तर सजग पर्यटक देखील गरजेचा आहे.

ता. क. हा लेख दिनांक 4 जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

Ref: Gazetteer of Bombay Presidency Volume XVIII Part III

 

 

आजिवली देवराईची अनोखी सफर

1578334478972.JPEG

देवराई म्हणजे देवाच्या नावे राखून ठेवलेले वन. तिथली फुले तोडायची नाहीत,फळे घ्यायची नाहीत, पाने तोडायची नाहीत. इथे कोणताच मानवी हस्तक्षेप मान्य नाही हा अलिखित नियम. पुणे जिल्ह्यामध्ये ३०० च्या आसपास देवराई आढळून येतात.

(ref:https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/a-novel-initiative-to-conserve-devrais-in-western-ghats/article24194228.ece)

मला नुकतीच फिरस्तीच्या अभ्यासकांबरोबर आजिवली देवराईला भेट देण्याची संधी मिळाली आणि ही संधी मी नक्कीच दवडणार नव्हते.

आमच्या प्रवासाची सुरुवातच अनोख्या पद्धतीने झाली. बसमध्ये चढतानाच, शिवाजी पुतळ्याला एक सुरेख, पुष्ट अळी दिसली. करड्या आणि केशरी  रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली  ही ४ इंची अळी मोठ्या दिमाखात कर्वे रस्त्यावर फिरत होती.

1578336254718.JPEG

“अरे हे तर ओलिएण्डर हॉक मॉथ आहे, मोठ्या झाडांवर बरेचदा आढळते”, इति मयुरेश कुलकर्णी. प्रवासाच्या सुरुवातीलाच इतका छान शुभ संकेत मिळाला होता त्यामुळे ट्रिप मस्त होणार आहे ह्याची खात्री पटली.

आमच्या बरोबर मयुरेश कुलकर्णी, हे जैवविविधतेचे तज्ञ आणि अनुराग वैद्य होतेच त्यामुळे आमचे शंकानिरसन तिथल्या तिथे होत होते.

बसमध्ये सुप्रसादने पुण्यातील डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या घरी जपलेल्या देवराई बद्दल माहिती पुरवली तर स्वप्नीलनी त्याच्या नेहमीच्या मिश्किल शैलीत महाराष्ट्रातील काही देवरायांबद्दल माहिती दिली.

तसेच मीनाक्षी वर्मा ह्या वनस्पती शास्त्रातील तज्ज्ञ तर भूगर्भ शास्त्रातील तज्ज्ञ सतीश कट्टी यांच्यामुळे निसर्गातल्या प्रत्येक घटकांचं डोळसपणे अवलोकन करता येत होतं.

eb4ca8e6-ec4f-4da0-93e9-46f465b884fd.jpg

रविवारची पहाट असल्यामुळे पुणे परिसर अद्याप सुस्तावलेला होता आणि धुक्याची दुलई अजून बाजूला सरली नव्हती. धुक्यातून वाट काढत हळूहळू आमची बस पुढे निघाली. जसजसा दिवस उजाडू लागला तसा दुतर्फा  पिवळ्या रानफुलांनी बहरलेला परिसर दिसू लागला. आजिवलीच्या दिशेने जाताना तुंग, तिकोना असे दोन संरक्षक किल्ले साथ देत होते तर पवनानगरचा परिसर डोळ्यांना सुखावत होता.

 

पुण्याहून साधारण ६० किलोमीटर वर असलेली ही देवराई सातशे छप्पन (७५६) हेक्टर मध्ये पसरली आहे. विस्तार बराच असला तरी त्या मानाने ही देवराई दाट नाही.सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. पण अनेक अशा देवराया आहेत जिथे दिवसा गडद अंधार असतो.

अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर ‘अंजनवेल’ म्हणून एका ऍग्रो रिसॉर्ट मध्ये (मावळ, शिळीम) आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. स्वच्छ, मोकळी हवा त्यामुळे भूकही कडकडून लागली होती. तिथे विविध रंगातली जास्वंदीची फुले पाहायला मिळाली. आपल्याकडे दिसतो त्याच्या दुप्पट आकार आणि गडद रंग दिसले. पोहे आणि चहा कॉफीचा दमदमीत नाश्ता झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला सिद्ध झालो.

IMG_5101.JPG

 

बस मध्ये विक्रम हा ‘आदिवासी विकास प्रबोधिनी’ या संस्थेचा तरुण आम्हाला  माहिती  देण्यासाठी  आला. त्यांच्या  संस्थेतर्फे गावाच्या विकासासाठी अनेक  कामे  केली  जातात. शिळीम गावाला त्यांनी बंधारा बांधून दिला आहे तसेच गावात मोफत दवाखाना चालू केला आहे आणि खास कौतुकाची गोष्ट म्हणजे एका आदिवासी पाड्याच्या सर्वच्या सर्व (चाळीस) घरांना सोलर पॅनल  दिले आहेत. पु. ना. गाडगीळ यांच्या  C.S.R. प्रोग्रॅमच्या माध्यमातून या संस्थेला आर्थिक मदत दिली जाते तसेच इथला शिळीम इंद्रायणी तांदूळ असा ब्रँड बाजारात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ही संस्था दिव्यांग मुलांकडून कलाकुसरीच्या विविध वस्तू बनवून घेते.

IMG_5112.JPG

देवराईच्या सुरुवातीला छोटं आजिवली गाव आहे. तिथे पोहोचलो तेव्हा जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे काही मुले खेळत होती. त्या मुलांचे विना खेळण्यांचे अनेक खेळ चालू होते. कोणी शाळेच्या पत्र्यावर चढून खाली धपाधप उड्या मारत होते तर कोणी आडव्या खांबांना लटकून झोके घेत होते. एका धिटुकलीने तर एका खेकड्याला दोरा बांधला होता आणि त्याच्याशी खेळात होती. आमच्या शहरी मुलांसाठी हा थोडा अचंब्याचाच विषय होता.

IMG_5122.JPG

 

गावातून चालत चालत आम्ही देवराईची वाट पकडली. भाताची शेतं पार करून आम्ही सह्याद्रीच्या कुशीत शिरायचा प्रयत्न करू लागलो. मनुष्याचा कमी हस्तक्षेप (खरे तर नाहीच) या मुळे इथे दुर्मिळ वनस्पती, झाडे, झुडपे, फळे  आढळून येतात. महाराष्ट्रात आजमितीला चार हजार देवराई नोंदवल्या गेल्या आहेत. देवराई एका झाडाची, किंवा अनेक हेक्टर जागेत पसरलेली असू शकते.

पुणे वन विभागाच्या अंतर्गत आता ही आजिवली देवराई आहे. या देवराई मध्ये जमिनीवर उगवणाऱ्या ऑर्किडच्या  सत्तावीस (२७) जाती सापडतात. या वर्षी झालेल्या तुफान पावसामुळे या फुलांच्या दर्शनाला आम्ही मुकलो पण पुढे अख्खा पिक्चर बाकी होता.

 

“अरे, हे झाड कुठले?” “अहाहा! काय सुंदर रंग आहे फुलपाखरांचा! या फुलपाखरांचे नाव काय?” “हा आवाज कोणत्या पक्ष्याचा?” अशा चौफेर भडिमाराला मयुरेश कुलकर्णी न कंटाळता उत्तर देत होते. नुसतेच सायंटिफिक नाव नाही तर त्या वनस्पतींचे देशी नाव, उपयोग, अजून कुठे सापडते, आणि त्यासंदर्भात आलेले मजेशीर अनुभव पण सांगितले. खाजखुजली, सीतेची आसवं, रानतंबाखू, दात पाडी, कोंबडा, कानफुटी अशी गमंतीशीर नावे असलेली झुडुपे दिसली. कारवीची झाडेपण मुबलक प्रमाणात दिसली.

 

20200106_235105.jpg

विविधरंगी फुलपाखरांच्या जोडीने केशरी, काळ्या रंगाचे, हिरवे, निळे चतुर (dragonflies) दिसले.

IMG_5115.JPG

चालताना अचानक शेकरूचा कॉल ऐकू आला.  त्या दिशेनी आम्ही डोळे आणि कॅमेरे सरसावून थोडा वेळ वाट पाहिली पण शेकरूचे दर्शन काही झाले नाही.

आता ऊन वाढायला लागलं होतं. पण एकदा का निसर्गाच्या नितळ रुपाची भुरळ पडली कि उन्हामुळे आपला  चेहरा रापतोय कि काळवंडतोय याचं काही भान राहत नाही. वाटेत खळाळणारे छोटे झरे डोळ्यांना थंडावा देत होतेच. गावापासून साधारण चार पाच किलोमीटर अंतर पार करून आम्ही देवराईच्या तोंडाशी येऊन पोचलो

1578327420570.JPEG

आपल्या पूर्वजांनी निसर्ग सरंक्षणासाठी देवराई ही एक उत्तम संकल्पना राबवली. देवाचा कोप होईल या भीतीने जंगलाचा काही भाग तरी संरक्षित राहिला. प्रत्येक देवराई ही कुठल्यातरी देवाच्या नावाने सोडलेली जागा असते. देवराईतील देवांची नावे मुळाबाई (मुळामुठा नदी फुटते तिथे), टेमलाई, सोमजाई, म्हातोबा अशी असतात. साधारणतः तांदळा रूपातल्या या देवतांचे मंदिर नसते तसेच या उग्रस्वरूपाच्या देवी देवता असतात.
इथे मात्र अपवाद दिसला. गावकऱ्यांनी तांदळा रूपातील वाघजाईचे देऊळ बांधले आहे. पायऱ्यांच्या सुरुवातीला शरभाचे चित्र आढळले.

1578327420815.JPEG

(नरसिंह जेव्हा उतला मातला तेव्हा भगवान शंकरांनी शरभाचा अवतार घेऊन त्याला मारले ही कथा पुराणात सापडते.) टीम लीडर अनुरागने माहिती पुरवली ” ही अशी चित्रे साधारतः किल्ल्यावर आढळून येतात. या शरभाच्या चित्रावरून या देवीला ‘वाघजाई’ नाव पडले असण्याची शक्यता आहे”

1578327420251

 

छोट्या टेकाडावरील या देवीचे दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. सगळेजण कॅमेऱ्यामध्ये सर्वोत्तम फ्रेम पकडायचा  प्रयत्न करत होते. पर्याय जास्त असले कि निर्णय घेणं आणखी कठीण होऊन बसतं, नाही का? इथे कॅमेऱ्याचा प्रत्येक अँगल, प्रत्येक फ्रेम सजीव होत होती. साथीला सिकाडा आणि क्रिकेट असा एकत्र किर्रर्र आवाज येत होताच. इथे आढळणाऱ्या एका घुबडानेही पुसटसे दर्शन दिले. सभोवताली बांबू, चाळीस, पन्नास ( ४०,५०) फुटी माडाची झाडे होती. आता खरा माहोल जमला होता. देवराईमध्ये गेल्याचा परिपूर्ण आनंद मिळत होता.

IMG_5142.JPG

 

काही वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याला ही देवराई विकत देण्याचे ठरले होते तेव्हा काही सुजाण गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ही देवराई वाचली. आजिवली देवराई मध्ये शिकार, सरपण किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी लाकूड  तोड, गाई गुरांना तिथे चरण्यासाठी नेणे यावर बंदी आहे. पश्चिम महाराष्ट्राला जैवविविधतेचे वरदान आहे. आपला हा खजिना आपणच जपून ठेवायचा आहे.

 

IMG-20200106-WA0013.jpg

 

परतीच्या वाटेत काही मंडळी गाडीच्या दिशेनी झपझप पावले टाकीत चालली होती तर काही अजूनही काही इंटरेस्टिंग दिसतंय का याचा शोध घेत होती.जरी वाट तीच असली तरी परतताना आधी लक्षात न आलेली झाडे दिसली. विविध आकारातले रंगीत बेडूक, दगडांशी एकरूप झालेले  मोठे कोळी, खेकडे, ब्रॅकेट फंगस दिसले.

तेवढ्यात मागून कौस्तुभ शाळीग्राम यांची हाक ऐकू आली.

“अरे हे बघा काय आहे”  “उदमांजराच्या पायाचे ठसे तर नव्हेत?”

स्वतःच्या हातावरील टॅटू बरोबर क्रॉस चेक करत आमच्यातील जाणकार मयुरेश कुलकर्णीनी होकार दिला. प्राणी नाही पण निदान ठसे तरी दिसले यामुळे मंडळी आता खुश झाली होती. निसर्गप्रेमी स्वातीने ते ठसे लगेच फोन कॅमेरा मध्ये टिपून घेतले.

Skype_Picture_2020_01_07T04_49_45_131Z.jpeg

 

जेवणासाठी आम्ही परत अंजनवेलला आलो.  मऊ, लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी, पिठलं, लाल आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, थंडगार ताक, कच्चा कांदा आणि गरमागरम भात असा मस्त बेत होता. सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती त्यामुळे आम्ही तिथल्या बाजेवर ठाण मांडून जेवण सुरु केलं. जेवताना गप्पा थांबल्या होत्या तरी नजरेनं आजूबाजूचा परिसर टिपणं चालूच होतं. वारली पेंटिंग्सनी रंगवलेल्या भिंती, जुने टायर वापरून बसण्यासाठी केलेले मोडे तसेच सुरेख आकाशकंदील लावून हा जेवणाचा हॉल सुशोभित केला होता. ही सर्व कलाकुसर दिव्यांग मुलांनी केली आहे.

 

नुकताच तिथे काही फ्रेंच लोकांचा ग्रुप आला होता. त्यातल्या दोघांना बेडसे लेणी चढताना उन्हाचा त्रास झाला होता. आमचे तसेही अकरा किलोमीटर चालणे झाले होते आणि बेडसे लेणी बघण्यासाठी चारशे(४००) पायऱ्या चढायला लगेच निघायचे होते. आमच्या ग्रुपमध्ये अगदी पाच वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष असे सर्व वयोगटातले उत्साही सभासद होते त्यामुळे हा पुढचा टप्पा लगेच पार करायला जमेल का अशी एक शंका आली. पण प्रत्यक्षात आमच्या ग्रुपचे सर्वात ज्येष्ठ सभासद फेणे काका सर्वात पहिले बेडसे लेण्यांवर जाऊन पोहोचले आणि त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन बाकी मंडळी पण पटापट वर चढून आली आणि उजेडात ही अद्भुत लेणी नीट बघायला मिळाली. बेडसे लेण्यांचा हा प्रवास नक्की अनुभवा आपल्या पुढच्या लेखात!
ता. क. हा लेख दिनांक ५ जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

गडांचा राजा: राजांचा गड : दुर्ग राजगड

1578143866915.JPEG

केल्याने देशाटन मनुजा शहाणपण येते असे म्हटले जाते पण खरे तर जसजसे आपण प्रवास करतो, विविध अनुभव घेतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो तसतसे आपल्याला अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या आणि अजून खूपच शिकायचे आहे ही जाणीव तीव्रतेने होते. कदाचित यामुळे जी नम्रता येते हेच खरे शहाणपण असावे.

1577816908927.JPEG

 

ट्रीपवरून आल्यावर लगेच एक दोन दिवसात ट्रिपचा अनुभव लिहून काढायचा हा माझा शिरस्ता. आमची राजगड मोहीम तर फत्ते झाली होती पण त्याचा इतिवृत्तांत लिहिण्यास माझ्याकडून थोडा वेळ गेला. दिरंगाईच म्हणाना पण तेवढ्यातच आमच्या धवल रामतीर्थकर या  सहकाऱ्याने अतिशय विस्तृत तरीही नेटका असा ब्लॉग आमच्या सहलीविषयी लिहिला. आता मी वेगळे काय लिहिणार असा प्रश्न मला पडला.पण पिंडे पिंडे मतिर्भिन्न: त्यांना कदाचित काही उत्तम गोष्टी समजल्या ज्या माझ्या कधीच लक्षात आल्या नसत्या तसेच मलाही काही वेगळ्या गोष्टी दिसतील, जाणवतील, मांडता येतील. कारण एकूण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो तसेच प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. ह्याच विचाराने एक अनोखी ऊर्जा माझ्या अंगात संचारली आणि तो दिवस एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्यासमोर उलगडू लागला.

राजगडची सहल ठरली तेव्हाच आमच्या ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या  ग्रुप च्या लीडर शंतनूने आमहाला कळवले होते कि आपण शक्य तेव्हढ्या लवकर निघू कारण राजगड चढायला तसा कठीण व दमछाक करवणारा आहे. त्यात एका दिवसात शक्य तेव्हढा राजगड आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही राजगडाची  नेहमीपेक्षा एक तास आधी ट्रिपची सुरुवात केली. काही कारणास्तव आमचा दुसरा लीडर अनुराग,  ट्रेकला येऊ शकत नव्हता. आमच्या सवंगड्याना वाटेवर घेत घेत आम्ही लवकरात गावकर नसरापूर फाटा गाठला. अशा ठिकाणांना पोचायला थोड्याफार अरुंद आडवाटा पार करायला लागतात त्या पार करत करत आम्ही राजगडाच्या पायथ्या जवळच्या एका हॉटेल मध्ये आलो. या वेळेस पोहे आणि सँडविच अशी शिदोरी आम्ही पुण्यातूनच घेऊन निघालो होतो. त्यामुळे तिथे खाण्यात फार वेळ गेला नाही आणि आम्ही लवकरच राजगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. पायथ्याशीच आम्हाला मुंबईचा ग्रुप येऊन मिळाला. नेहमीप्रमाणे आम्ही सर्वांची ओळख करून घेत होतो, विविध वयोगटातले, विविध क्षेत्रातले व्यक्ती आमच्या गटात होते.

या वेळच्याआमच्या ट्रिपचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गतज्ञ आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. सचिन जोशी आमच्या बरोबर होते. आतापर्यंत फक्त युट्युब  किंवा पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळत होती.

1577816908401.JPEG

वाटेत गरज पडेल तसे २,३ ठिकाणी थांबत, कधी पाणी पीत तर कधी ग्लुकॉन D च्या गोळ्या चघळत आमची चढण सुरु होती. बराचवेळ चालल्यावर आमची आपापसात चर्चा झाली आता चढण संपतच आली असेल ना? तेवढ्यात एका अनुभवी ट्रेकरने आम्हाला कानपिचकी दिली “अरे अजून अर्धी सुद्धा चढण झाली नाहीये. चला पटापट”.

1577816203161.JPEG

ते ऐकताच परत आम्ही पुढे चालू लागलो. पायऱ्या सुरु झाल्या कि राजगड आलाच असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात पायऱ्या खूप उंच असल्याने त्या चढायला तशा कठीण आहेत. थोडे अंतर चालल्यावर पाली दरवाजा खालून दिसायला लागला आणि मग मात्र सर्वांना हुरूप आला, आणि झटझट पावले टाकत आम्ही दरवाज्याजवळ आम्ही पोचलो. महाराजांच्या अगदी सुरुवातीच्या काळात बांधलेल्या  किल्ल्यांपैकी एक असल्याने बाकीच्या किल्ल्यांवर दिसतात तसे गोमुखी दरवाजे इथे नाहीत. पाली दरवाजा वर येताना सहज दिसून येतो. या दरवाज्यातून थेट समोर तोरणा दिसतो.

तिथून पुढे आम्ही सदरेवर आलो. शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

 

1578144273698.JPEG

या समाधी जवळ एक पुरातन दीपमालाही आहे. समाधीच्या समोर पद्मावती देवीचे मंदिर आहे तिथे सर्व जण दर्शनाला गेलो. राजगडावर मुक्कामासाठी बरेचजण या मंदिराचा वापर करतात.

1577816908218

आम्ही सर्व आज्ञाधारक विद्यार्धी जोशी सरांच्या भोवती कोंडाळे करून बसलो. नेहमीचे ट्रेकर्स काही काही प्रश्न विचारते होते आम्ही मात्र श्रवण भक्ती करत होतो. पद्मावती देवी मंदिरात एक मूळ मूर्ती जी पूर्वी पूजेत असावी ती आहे आणि समोर दर्शनासाठी जरा घडीव अशी काळ्यापाषाणातील मूर्ती तिथे आहे. पेशवेकालीन रचना दाखवणारे लाकडी खांबही तिथे आहेत.

1578144272541.JPEG

 

पद्मावतीदेवीचे दर्शन घेऊन आल्यावर बाहेर जोरदार चर्चा सुरु झाली कोण बाले किल्ल्यावर जाणार आणि कोण संजीवनी माचीवर जाणार. बाले किल्ला चढायला कठीण अगदी नवख्या ट्रेकर्स ने तो करू नये पण ‘अभी नही तो कभी नही’ या तत्वानुसार आम्ही बालेकिल्ल्याची निवड केली.

काही  मोजके लोक वगळता बाले किल्ल्याचे धाडस करायला सगळे तयार झाले. उभी चढण त्यातले तीन अवघड रॉक पॅचेस आणि त्यात आम्ही गिर्यारोहणात अगदीच नवखे (लोहगड, सिंहगड चढणे आणि हा बाले किल्ला सर करणे यात फार अंतर आहे.) अगदी डोळ्यात तेल घालून पूर्ण एकाग्रतेने आम्ही हा बालेकिल्ला चढत होतो. सुरवातीलाच एक अवघड रॉक पॅच होता पण वरून खाली येणाऱ्या एका ट्रेकरने आम्हाला योग्य त्या सूचना देऊन वर चढायला शिकवले आणि वर खेचून घेतले. या पुढे एक अर्धा किलोमीटरची अरुंद पायवाट होती. इथे मधमाश्यांची पोळी आहेत त्यामुळे तिथून चालताना अतिशय शांततेत चालावे लागते. कोणत्याही प्रकारचा आवाज करून चालत नाही. जोशी सरानी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही हात व चेहरा जॅकेटने झाकून शांतपणे हा टप्पा पार केला. वरच्या भागात चढताना रेलिंग बसवले आहेत त्याला धरून आम्ही पुढचे दोन टप्पे पार केले. आमच्या टीम मधले एक्स्पर्ट ट्रेकर्स कौस्तुभ, डॉक्टर  चैतन्य, विधाते सर, आशिष , घांग्रेकर तसेच मुंबई टीमचे अमित, योगेश हे आम्हाला मदत करत होतेच.

बाले किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या महालाचे अवशेष बघायला मिळतात. बाले  किल्ल्यावरून सुवेळा माचीचा अप्रतिम नजारा तसेच भाटघर धरणाचे बॅकवॉटर बघता येते. बालेकिल्ल्याचा बांधकाम १६४२ (सोळाशे बेचाळीस) ते १६६२ (सोळाशे बासष्ट) या दरम्यान झाल्याचे इतिहास तज्ज्ञ सांगतात. याच किल्ल्यातून जिजामातांनी सिंहगडावरील परकीयांच निशाण बघितला आणि त्यांना तीव्र दुःख झाले आणि महाराजांच्या शूर सैनिकांनी आणि सरदार तानाजी मालुसरेंच्या मोठा पराक्रम गाजवून तो किल्ला परत स्वराज्यात सामावून घेतला हा इतिहास आपण वाचला आहेच. “आधी लगीन कोंढाण्याचं” म्हणत जिथे तानाजी मालुसरेंनी राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या साक्षीने किल्ला जिंकण्याची शपथ घेतली त्याच जागी आज आपण उभे आहोत या विचारानेच आम्हाला खूप अभिमान वाटला.

1577816910470.JPEG

ब्रह्मर्षी देऊळ, विविध बुरुज तसेच विविध तलाव पाहून आम्ही बाले किल्ला उतरायला सुरुवात केली. बालेकिल्ला मोहीम फत्ते झाल्यावर आपण काहीतरी महान कर्तृत्व गाजवले आहे अशा थाटात मी परत त्या उभ्या चढणीकडे बघितले आणि बघते तर काय एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा झपाट्याने बालेकिल्ला सहज उतरत एक ८० (ऐंशी ) वर्षाच्या आजीबाई झरझर येत होत्या. आमच्या गर्वाचं घर इतक्या लवकर खाली होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्या ससून मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं कळलं. त्यांच्या बरोबर “सेल्फी तो बनता है” असं म्हणून आम्ही आळीपाळीने फोटो काढून घेतले.

1577816911018.JPEG

 

खाली येताच सर्वजण सदरेवर जमलो तो पर्यंत दुसरा ग्रुप सुद्धा संजीवनी माची करून परत आला होता. राजगडाच्या दर्शनाने मन अगदी तृप्त झालं होतं त्या नंतर फक्त भुकेची वेळ आहे म्हणून सर्व जण शिदोऱ्या सोडून जेवायला बसलो. मडक्यातलं दही आणि बरोबर आणलेले पराठे यामुळे आता पोटोबाही निवांत झाले होते.

राजगड पूर्ण पाहायचा असेल, पूर्णपणे अनुभवायचा असेल तर खरं म्हणजे ८ दिवस हवेत आणि आम्ही तर एका दिवसात परत जाणार होतो. थंडीत अंधारही लवकर पडतो त्यामुळे जेवणानंतर लगेचच आम्ही परतीच्या वाटेला सुरुवात केली.

खाली उतरताना आमचा वाढलेला आत्मविश्वास आम्हाला जाणवत होता. खाली एका चहाच्या टपरीवर सगळेजण थांबलो. टपरीवर चहा आणि वडा पाव वर सर्वांनी मस्त ताव मारला. आमच्यापैकी कोणाचा पाय मुरगळला होता, कोणाला क्रम्प्स होते पण राजगड चढून, भटकून एक अनोखा उत्साह टीम मध्ये संचारला होता. गाडीत चढायच्या आधी डॉ. चैतन्य व मिलिंद परांजपे यांनी आम्हाला काही स्ट्रेचेस शिकवले त्यामुळे परतीच्या प्रवासाला सगळे सज्ज झाले.

संपूर्ण ट्रेकभर जाणवलेली मौल्यवान गोष्ट म्हणजे टीमवर्क. ग्रुपमधला प्रत्येक मेंबर आपापल्या परीने एकमेकांना मदत करीत होता. मी माझ्या पुरते बघेन तुमचे तुम्ही बघा अशा दृष्टिकोनाला तिथे थाराच नव्हता. आणि हेच आमच्या यशस्वी ट्रेकचे गमक आहे.

IMG-20191124-WA0046.jpg

या ट्रेकने मला काय दिले? तर निखळ आनंदात घालवलेला एक दिवस, शाळेत कधीही न वाचलेल्या, माहिती नसलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी, पुरेपूर आत्मविश्वास, उत्तम गटकार्य आणि निसर्गाचा अमूल्य सहवास.

पूर्वी एका ज्येष्ठ गिर्यारोहकाने आकाशवाणीवरील त्यांच्या मुलाखतीत एक वाक्य सांगितले होते “सर्वात कठीण गड म्हणजे उंबरगड अर्थात घराचा उंबरा”. तो पार केल्याशिवाय मुक्तपणे निसर्गात भटकंती केल्याशिवाय, चढाईचे कष्ट घेतल्याखेरीज राजगड कसा आहे हे आपल्याला समजणार नाही.  मग येताय ना लवकरच, राजगडाच्या दर्शनाला?

ता. क. हा लेख दिनांक ४ जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.