सिन्नरचे शिल्पवैभव : गोंदेश्वर , ऐश्वर्येश्वर

अरे हा कुठला फोटो आहे?  काय भारी लोकेशन आहे,  स्वर्गमंडप म्हणतात तो हाच का रे? खिद्रापूर आहे का हे? इतके मोठे देऊळ साऊथ मधले आहे का काय?  शंतनू आणि अनुराग यांच्या फोटोंवर अशी प्रश्नांची सरबत्ती झाली होती सुमारे वर्षभरापूर्वी. बरोबर तोच प्रसंग आज माझ्याबरोबर घडत होता. उत्साहाने स्टेटस वर फोटो अपलोड  केले होते आणि  फोटो अपलोड केल्यापासून साधारण १  तासात सुमारे १०० लोकांना या मंदिरांचे नाव आणि जागा सांगत  रिप्लाय करत होते.

.पुण्याहून सुमारे 190 Km वर सिन्नर मधील  गोंदेश्वर मंदिर भेटीची ही किमया. पूर्वापार तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक /नासिक आणि त्याच्या जवळच असलेला हा सिन्नरचा संपन्न परिसर

फिरस्ती महाराष्ट्राची या ग्रुप बरोबर आधीच्या अनेक ट्रिप्स चा अनुभव गाठीशी असल्यामुळे या ट्रिपचा चान्स तर मी सोडणारच नव्हते.  आधीची ट्रीपची तारीख माझ्या सोयीची नव्हती पण नशिबाने त्यांची ट्रिप पुढे ढकलली गेली आणि या मंदिराला  भेट देण्याचा योग जुळून आला.

भल्या पहाटे ५ ला आम्ही निघालो होतो तरी कोणीही डुलक्या काढण्याच्या मूड मध्ये नव्हते त्यामुळे सुरवातीपासूनच गप्पांचा फड  जमायला लागला. अगदी चेडोबा मंदिर, रिचर्ड बर्टनचे पुस्तक तसेच  भौगोलिक वर्णने ज्यात नाशिकचे वर्णन प्रामुख्याने येते अशा ‘विविध तीर्थ कल्प’ या ग्रंथाची चर्चा रंगू लागली. मध्ये थोडी विश्रांती घेऊन, श्री गुरु या हॉटेलमध्ये चविष्ट नाश्ता करून आमची गाडी परत सिन्नरच्या दिशेने धावू लागली.  

आमचा प्रवासाचा पहिला टप्पा होता ऐश्वर्येश्वर! तिथे पोचल्यावर पटापट सगळ्यांचे कॅमेरे आणि मोबाईल्स बाहेर निघाले. विविध अँगल्स टिपण्यात सगळे मश्गुल झाले. मंदिराच्या मागच्या बाजूची शिल्पे गर्दी नसताना टिपावीत या हेतूने मी आधी तिकडे धाव घेतली पण ती व्यर्थ  ठरली कारण तिथे Pre – Wed  शूट साठी टीम जमली होती त्यामुळे नवरा , नवरी आणि कॅमेरामन यांना त्रास न देता अस्मादिक परत मंदिराच्या पुढील भागात परत आले. 

ऐश्वर्येश्वर हे मंदिर ऐरम राजाने बांधलेले आहे. सरस्वती नदीच्या काठी बांधलेले हे मंदिर साधारण १० व्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. यादव काळातील पहिली राजधानी हा मान सिन्नर ला मिळतो.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भ गृह पाहता येते. या मंदिराची रचना द्राविड शैलीत आहे. या मंदिरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मकर तोरण. सामान्यतः अंतराळाच्या प्रवेशाचे वरच्या बाजूस हे मकर तोरण आढळते.

या तोरणात व्याल, कीर्तिमुख,यक्ष, अप्सरा आणि मयूर असे थर दिसून येतात. दोन मगरीच्या तोंडांतून निघालेली ही वैशिष्टयपूर्ण शिल्पे आणि मधोमध नृत्यरत शिव. आत वितानावर अष्ट दिक्पाल कोरलेले आढळतात.  या देवळात सप्तमातृकापट, भैरव,गणपती यांच्या  बरोबर ललाट बिंबावर गजलक्ष्मी दिसून येते.

चक्रधर स्वामी यांच्या स्थानपोथी मध्ये ऐश्वर्येश्वर या देवळाचे उल्लेख येतात ही माहिती पण ग्रुप लीडर अनुरागने पुरविली.

देवळात एक माणूस शांत चित्ताने शिवपिंडीला अभिषेक घालत होता. बाहेरचा कोलाहल, गटागटाने येणारी, मोबाईल,  कॅमेरे हातात घेऊन आसपास भिरभिरणारी माणसे, मंदिर परिसरातच  चाललेले Pre – Wed  शूट याचा काहीही परिणाम न होता शांत एकाग्र चित्ताने तो तन्मय झाला होता.

त्यानंतर आमचा मोर्चा वळला ते मुख्य मंदिराकडे म्हणजे गोंदेश्वरकडे. अवघ्या १० मिनिटात आम्ही तिथे पोचलो. दगडी तटबंदीयुक्त देवळात  मुख्य दरवाजातून प्रवेश केला. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील संरक्षित  स्मारक म्हणून घोषित केले आहे.  आत प्रवेश करतानाच भव्य परिसरात वसलेले पंचायतन (मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूला उपमंदिरे) दिसून आले. गोंदेश्वर हे शैव पंचायतन आहे. मध्यभागी शिव आणि बाकीच्या चार कोपऱ्यात गणपती, सूर्य, देवी व विष्णू यांची मंदिरे आहेत. A.S.I. ने ह्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी करून मंदिराचे सौंदर्य अबाधित राखले आहे.

पूर्व आणि दक्षिण दिशांना दरवाजे असून सध्याच्या वापरासाठी दक्षिण दरवाजा खुला आहे. आत शिरताच डाव्या हाताला एक खोलीवजा जागा आहे. पूर्वीच्याकाळी भांडार गृह, स्वयंपाकाची खोली असा त्याचा वापर होत असावा.

आत शिरताच मी, शिवराज आणि सविता मॅडम ने एका अमेझिंग फोटो स्पॉट च्या दिशेने धाव घेतली तो स्पॉट म्हणजे गोंदेश्वर च्या मंदिरातील, मुख्य मंदिरासमोर असलेली  धर्मशाळा किंवा मठ. यातील वरचा भाग पडून गोलाकार भाग उघडा  झाला आहे त्यामुळे  तिथे खिद्रापूरच्या स्वर्गमंडपासारखी जागा  निर्माण झाली आहे. बाकी टीम इकडे तिकडे फिरण्यात व्यस्त आहे हे बघून आम्ही निवांतपणे  एकमेकांचे मस्त फोटो काढले.  बाकीच्या टीम ला हा स्पॉट न सांगण्याचा एक कुचका प्लॅन पण आमच्यात शिजला पण टीम मध्ये आधीच रथी महारथी होते आणि बाकीचे स्मार्ट लोकं इन्टरनेट वरून सगळी माहिती घेऊन आले होते त्यामुळे लवकरच तिथे गर्दी जमली व आम्हालाच काढता पाय घ्यावा लागला.  

गोंदेश्वर मंदिराच्या एका देवळाच्या सावलीत आम्ही कोंडाळे करून बसलो. ग्रुप लीडर शंतनूने मंदिर कल्पना कशी अस्तित्वात आली हे सुंदररित्या समजावले.  मला देगलूरकर सरांच्या ‘मंदिर कसे पाहावे’ या पुस्तकाची आठवण आली. त्यात परिपूर्ण मंदिर वास्तू म्हणजे काय? मूर्तीसंबंधीच्या कल्पना, मंदिरे, त्यावरील शिल्पकृती यांच्या निर्मितीमागील उद्दिष्टे, तसेच त्यातील कलात्मकता आणि तात्विकता अतिशय उत्तम पद्धतीने उलगडून दाखवली आहे.    

गोविंद नावाच्या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधल्याचा संदर्भ शंतनूने दिला. देवळाला साधारण पुरुषभर उंचीचे अधिष्ठान आहे, त्यावर मंडोवर, शिखर व कलश अशी रचना आहे. शंतनू ने जवळच गोंदे गाव असल्याचाही उल्लेख केला. या देवळाचे भूमिज शिखर साप्तभौम पद्धतीचे आहे. पूर्ण मंदिर भूमिज वेसर पद्धतीत बांधलेले आहे. मंदिराच्या पूर्वदिशेला नंदीमंडप आहे, तोही अनेक पौराणिक शिल्पे, फुले पाने वेलबुट्टी याने सुशोभित आहे. सभामंडपात रंगशिळा आहे त्यापुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मकरमुख. मकर हे गंगेचे वाहन असल्यामुळे इथे अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची रचना आहे. 

मंदिराला सर्वात खाली गज थर आहेत पण त्याच्या सोंडा कापून टाकलेल्या आहेत.

या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते की चोराला या हत्तीपैकी एका हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला आणि त्यांनी लालसेपोटी बाकीच्या हत्तीच्या सोंडा कापून टाकल्या. या  गजथरावर  यादव कालीन देवळांचे वैशिष्ट्य असलेली पानाफुलांची नेहमीची वेलबुट्टी आढळते.

आमच्या ट्रिप मध्ये नाशिकहुन महेश शिरसाठ हे इतिहास अभ्यासक एक छोटा ग्रुप घेऊन आम्हाला जॉईन झाले. त्यांची इतिहासाची, मूर्तिशास्त्राची आवड आणि अंगी असलेली नम्रता प्रकर्षाने जाणवली. त्यांनीही अनेक शिल्पे आम्हाला उलगडून दाखवली.

मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या अनेक अप्रतिम नर्तकी, सुरसुंदऱ्या, दर्पण सुंदरी, हातात कलश घेतलेली जया,डालंबिका,आलसा तसेच  रामायणाचे शिल्पपट,  देवी देवता यांच्या मूर्ती, मैथुन शिल्प, आजूबाजूच्या समाजव्यवस्थेचे चित्रण करणारी शिल्पे, वामन अवतार, वराह अवतार तसेच अनेक पौराणिक प्रसंग दिसून येतात. या कमनीय बांध्याच्या सुरसुंदरी नर्तिका पाहताना मनात कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या काही ओळी मनात रुंजी घालत होत्या

‘केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी?

चांदण्यास शृंगार  कशाला बसशील तेथे लेणी ‘

मंदिरातील आतील खांबसुद्धा अनेक शिल्पांनी सुशोभित आहेत.  कुठे नरसिंह अवतार तर कुठे वामन अवतार, कुठे मैथुन शिल्पे तर कुठे आई, बाळाला झोळीत झोका देता देता ताक घुसळत घरगुती कामे करतीय अशी शिल्पे. सर्व भिंती, छत, प्रत्येक स्तंभ कोरीवकामाने नखशिखांत लगडलेले दिसतात. मंदिराची द्वारशाखा, स्तंभ शाखा, वेलबुट्टी शाखा अशा विविध शाखांनी नटलेली आहे.

Dwarshakha

 या मंदिराच्या रचनेत चुना किंवा मातीचा वापर न करता एकावर एक दगड रचून इंटरलॉकिंग पद्धतीने याची रचना केलेली आहे. इथे सूर्यमंदिर असल्याने रथसप्तमी ला इथे उत्सव असतो तसेच अनेक जण त्या उत्सवात सूर्यनमस्कार घालतात.

चहा नाश्त्याचे सेंटर चालवणारे भरत शिंदे आमच्यासाठी अतिशय उत्तम जेवण घेऊन आले होते, मटकी उसळ, पिठले, पोळ्या, बटाटा भाजी, भात, डाळ,  पापड  आणि जोडीला झणझणीत मिरचीचा ठेचा असा मस्त बेत रंगला. मंदिर परिसरात सावलीत आमचे अतिशय उत्तम भोजन झाले. भरत शिंदे हे रोजच्या नफ्यातील पहिली जी काय मिळकत असेल ती समाजोपयोगी कामासाठी देतात हे ऐकून खूपच आनंद वाटला.

आमच्या गटातील मंजुघोषा पवार या पंढरपूरच्या. तिथे त्या एक उपहारगृह चालवतात. आषाढ शुद्ध द्वादशीला सर्व भक्त गणांसाठी, वारकऱ्यांसाठी आणि पांथस्थांसाठी त्या पहाटे पासून ते रात्रीपर्यंत पुलावाचे / खिचडीचे  वाटप पूर्णपणे मोफत, विठूरायाची एक सेवा या भावनेतून करतात.

एक छोटीशी ट्रिप सुद्धा किती नवनवीन अनुभवांची, विचारांची शिदोरी देऊन जाते ना? 

खरे सांगायचे तर अशा शिल्पांच्या दुनियेत प्रवेश केल्यावर माझी अवस्था थोडीशी भांबावल्यासारखीच होते. काय काय पाहू, समजून घेऊ, कॅमेऱ्यात बंदिस्त करू ….. दुबळी माझी झोळी अशी काहीशी अवस्था. त्यामुळे एकाभेटीत संपणारा हा विषय नक्कीच नाही. परत परत या ठिकाणी येऊन अजून काही शिल्पकलेचे बारकावे बघायचे आहेत.

परतीचा प्रवास काहीसा कंटाळवाणा झाला. बरीचशी मंडळी आता दिवसभरामुळे दमून गेली होती पण मी मात्र टक्क जागी आणि इतर काही अजून वाटेत बघता येईल का ही चाचपणी करत  होते. डुबेर इथला बर्वे वाडा (बाजीराव पेशवे यांचे जन्म स्थळ), मुक्तेश्वर, टाहाकारीचे भवानी मातेचे मंदिर , गारगोटी म्युझियम अशी बरीच मोठी लिस्ट पुढच्या ट्रिप साठी मनात तयार होत होती. 

चाकण जवळ आल्यावर मंडळी हळू हळू जागी होऊ लागली, स्वप्नाली, स्वानंदच्या कोकणच्या गप्पा सुरु झाल्या. स्वप्नालीच्या काकूंना वाटेत एका ठिकाणाहून चहा ची पावडर घ्यायची होती. आम्हा सगळ्यांना आता चहाला घरी बोलावलेच पाहिजे असे आम्ही चिडवले, त्यांनीही ते अगदी मजेत घेत होकारही दिला.असा आमचा परतीचा उरलेला प्रवास छान खेळीमेळीत पार पडला.

गोंदेश्वरचे शैव पंचायतन म्हणजे स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेचा एक अत्युत्तम नमुना. फिरस्ती बरोबरची ऐश्वर्येश्वर आणि गोंदेश्वर ही ट्रिप नेहमीप्रमाणेच खूप आनंद देऊन गेली, अजून नवीन गोष्टी शिकण्याचा, पाहण्याचा, वाचण्याचा उत्साह देऊन गेली.