नाणेघाट आणि कुकडेश्वर मंदिर अभ्यास सहल :एक संपन्न करणारा अनुभव

ऐतिहासिक महत्व असलेल्या जुन्नरस्थित नाणेघाटला भेट द्यायचे बरेच दिवस मनात होते पण योग मात्र आला मागच्या महिन्यात. ‘फिरस्ती महाराष्ट्राची’  या भटकंती वेड्या व इतिहास प्रेमी तरुणांनी आयोजित केलेली एक दिवसाची सफर खूप आनंद देऊन गेली आणि समृद्ध बनवून गेली.

20190929_115414.jpg

Satvahan Caves

कोथरूडमधून निघालेली  आमची बस, विविध वयोगटातील, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेत घेत पुढे निघाली. टीम लीडर अनुराग वैद्य बरोबर होता. वाटेत पुरोहित स्नॅक्सला पहिला ब्रेक घेतला. तिथे उपमा आणि चहाच्या जोडीनेच ऐतिहासिक विषयांवरच्या चर्चा सुरु झाल्या व रंगू लागल्या. आमची ट्रिप खूपच चांगली आणि यशस्वी होणार याची चाहूल लागली. सर्व वयोगटातली पण मनानी अतिशय तरुण अशी मंडळी साथीला होती. तिथून पुढे जात होतो तोच वाटेत सोनकीच्या फुलांनी बहरलेला शंभुमहादेवाचा डोंगर दिसला.

 

20190929_104411

मी चालत्या बस मधूनच त्याचा फोटो टिपला. निसर्गाने हिरव्या, पिवळ्या, सोनेरी, आणि विविध रंगांची मुक्त उधळण केली होती. मधेच एका ठिकाणी थांबून काही फोटो टिपले. एका निष्पर्ण झाडाचे प्रतिबिंब मोबाईल मध्ये काढले. अहो, वय काहीही असलं तरी आपलं प्रतिबिंब पाहण्याचा मोह सर्वानाच होणार. ते निष्पर्ण झाड आपलं हे रूप देखील निरखत निश्चल उभं होतं.

 

20190929_110229

आम्ही परत बस मध्ये चढलो आणि अनुराग आणि टीमने नाणेघाट, सातवाहनकाल आणि ब्राम्हीलिपी याची माहिती असलेला कागद हातात ठेवला. तो कागद वाचत, माहितीचे आदानप्रदान करत असताना, बोलण्याच्या नादात जिथे वळायचे होते तो रस्ता सोडून पुढे आलो. मग परत मूळ वाटेवर जाऊन नाणेघाटात पोचलो. आमच्या ग्रुपप्रमाणेच काही २, ३ गाड्या व बायकर्स आलेले दिसले. पण विशेष गर्दी नव्हती.

गाडीतून उतरताच विस्तीर्ण पठाराने आमचे स्वागत केले. काटे कोरांटी, सीतेची आसवं,सोनकी, कुर्डू  अशा विविध फुलांनी तर त्यावर भिरभिरणाऱ्या ब्लू मॉरमॉन, कॉमन क्रो या फुलपाखरांनी सर्वांनाच मोहित केलं.

IMG_4941

सह्याद्रीच रांगडं वैभव आणि त्याला अशी नाजूक फुलापानांनी नटलेल्या, बहरलेल्या निसर्गाची साथ या पेक्षा अजून काय वेगळं हवं? या फुलांनी सर्वांनाच भुरळ घातली आणि प्रत्येकातील फोटोग्राफर आपापले मोबाईल, कॅमेरे, लेन्सेस, ट्रायपॉड अशी विविध आयुध घेऊन सज्ज झाला.

 

IMG_4939

 

आता आमचा मोर्चा मुख्य मिशनकडे म्हणजेच नाणेघाटाकडे वळला. नाणेघाटाच्या सुरवातीलाच एक भला मोठा रांजण आढळला. काहींच्या मते पूर्वीच्या काळातील कर वसुलीची ही व्यवस्था असावी. नाणेघाट हा कोकणाला जोडणारा मुख्य दुवा त्यामुळे हा मुख्य व्यापारी मार्ग होता. त्यामुळे कदाचित यात नाणे टाकून व्यापाऱ्यांना पुढे जायची परवानगी मिळत असावी. पण या विषयी काहीच ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

20190929_114730

जुन्नरमधील नाणेघाट हा दोन मोठ्या कातळात नैसर्गिकरीत्याच तयार झालेला खंदक आहे असे इतिहासकारांचे मत आहे. कोंकण आणि देश या दोन्हीच्या मध्ये उभ्या ठाकलेल्या सह्याद्री मधून माणसांची ने आण तसेच व्यापारासाठी गरजेचा असलेला हा नाणेघाट सातवाहनांनी बांधून काढल्याचे मानले जाते.

IMG_4956

जुन्नर(पूर्वीचे जीर्ण नगर) ही सातवाहनांचा पाडाव ज्यांनी केला त्या नाहपानांची राजधानी. पुढे सातवाहनांनी ते परत जिंकले व जुन्नर हे व्यापार दृष्ट्या महत्वाचे सत्ताकेंद्र बनले.साधारण साडे चारशे वर्ष (इ.स.पूर्व २०० ते इ.स.२५०)टिकून असलेला हा राजवंश तितकाच कर्तबगारही होता. सातवाहनांनी (शालिवाहन) आपल्या काळात स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला तसेच संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय यात प्रगती करून महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात सातवाहन राजवंशाला अनन्य साधारण महत्व आहे.

सातवाहन हा महाराष्ट्रातील सर्वात पुरातन राजवंश ज्याचे लेखी पुरावे आपल्याला मिळतात. सातवाहनांचे राज्य दक्षिण तसेच मध्य भारतात पसरलेले होते व साडे चारशे वर्ष टिकून राहिले होते. या सातवाहनांचे सर्वात प्राचीन लेख जे ब्राम्हीलिपी मध्ये आहेत ते इथे सापडतात.

20190929_121925

नाणेघाट हा खरंतर दगड धोंड्यानी बनलेला, थोडासा उतार असलेला एक बायपास रोड आहे. पूर्वी इथे घोड्यावरून वाहतूक होत होती.नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच गुहांमध्ये पाणी साचल्यामुळे छोटे छोटे बेडूक जागोजागी आढळून येत होते. ते दगडाच्या रंगांशी इतके एकरूप झाले होते कि चुकून आपला पाय त्यांच्यावर पडू नये म्हणून अजून काळजीपूर्वक चालायला लागत होते.आम्ही एका सातवाहन कालीन गुहेपाशी येऊन पोचलो.ब्राम्हीलिपी मधील काही शिलालेख या गुहेत आहेत.  त्यामध्ये त्या काळातील राजांनी केलेल्या यज्ञांची विस्तृत माहिती दिली आहे. किती धान्य दिले, गोधन, तसेच किती हत्ती दक्षिणा म्हणून दिले याची माहिती त्यात आहे. अश्वमेध यज्ञाचे उल्लेखही आढळतात.

याच गुहेत सातवाहन कालीन राज्यकुलाचे पुतळे कोरलेले होते. राणी नागनिका, सम्राट सिरिसातकर्णी, युवराज स्कंदश्री इत्यादींचे पुतळे होते. सातकर्णी सातवाहन हा नागणिकेचा पती तर वेदिश्री, सतीश्री,हकुश्री ही त्यांची मुले.आज त्या जागेवर ब्राह्मी लिपीतील नावे आढळून येतात त्यावरून हा तर्क लावता येतो.

बघण्यायोग्य अशी हि एकच गुहा आहे. बाकी गुहांमध्ये पाणी असल्यामुळे तसेच त्या खूप अरुंद असल्यामुळे तिथे जाणे अवघड आहे.

20190929_122022

गुहा पाहून आम्ही परतत असताना ‘नानाचा अंगठा’ आम्हाला खुणावत होता. एक १० मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही वर पोचलो आणि सह्याद्रीच्या रौद्र रूपाचं दर्शन घेतलं.

 

चहूबाजूंनी पसरलेले डोंगर आणि मधोमध खोल दरी अशा दर्शनाने आम्ही काही काळ निशब्द झालो. कॅमेऱ्याच्या क्लिक क्लिकाटाला काही काळ विश्रांती देऊन ते विहंगम दृश्य आम्ही डोळ्यात साठवू लागलो.

 

20190929_124402

नानाचा अंगठा,  ही एक छोटीशी टेकडी म्हणजेच पुणे जिल्ह्याचे एक टोक आहे. इथून जीवधन किल्ला, हरिश्चंद्रगड, भैरवगड, गोरखगड इत्यादी दुर्गाचं दर्शन होतं. चढताना विशेष त्रास झाला नाही पण खरी कसरत उतरताना होती. पावसामुळे वाट थोडी घसरडी झाली होती त्यामुळे तिरकी पावले टाकत,  पायाने ग्रीप घेत आम्ही हळूहळू उतरलो.

चला पटकन नाणेघाटाची एक व्हर्चुअल टूर करूया.

 

पावसाळा संपता संपता इथे भेट दिल्यास खूप आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मिळतो.

20190929_122400

 

आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता प्राचीन कुकडेश्वर मंदिर. अप्रतिम कोरीवकाम आणि उत्तम स्थापत्यकला याचे उत्तम उदाहरण असलेल्या कुकडेश्वर मंदिराची माहिती घेऊया पुढील भागात